Wednesday 24 January 2024

विठाई

विठाई हो विठाई !

विठ्ठल रखुमाई...परमेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पंढरपूर पाहण्याची इच्छा मनात आली ती वारीमुळे. दोनदा आळंदी पुणे वारी त्यान घडवली आणि तो पांडुरंग बघायची इच्छा तीव्र झाली. मी कारण शोधातच होते. मग नवऱ्याचा पन्नासावा वाढदिवस निमित्त साधून पांढुरंगाचा अभिषेक करावा हा विचार आला. तो योगच होता, ती योजनाच होती त्या पांडुरंगाची. सहा महिना पूजेसाठी बोलून ठेवले होते. जानेवारीत पाद्य पूजेचा योग आला. मग घराच्या दोन जोड्यांना विचारलं त्या पण तयार झाल्या. मग तर काय आनंदाला पर्वणीच. एकंदर १५ जण निघालो. सकाळी नऊला निघून दोनला पोचलो सुद्धा पंढरपुरला. 
शेगाव संस्थांची उत्तम सोय होती. परगावी काय लागत तर स्वच्छ शौचलय, झोपायची जागा आणि जेवण. इकडची शिस्त तर वाखाणण्याजोगीच. मी तर म्हणेन भारतातील सर्व देवस्थानांनी शेगाव संस्थांच्या व्यवस्थापनाकडून प्रशिक्षणाचं घ्यायला हवे. योग्य खर्चात योग्य गरजा कशा भागवल्या जाऊ शकतात याचे उत्तम उदाहरण आहे हे. 
वाटेत नास्ता बराच छान झालेला कोणास खुप भूकही नव्हती. तासाभरात आवरून सगळे विष्णुपद गोपाळपूर पाहायला निघालो. 
विष्णुपद 
गाडीने मोजून ८ मिनिटात आपण विष्णुपद ला पोचतो. चंद्रभागाच्या मध्ये हे विष्णुपद आहे. परिसर स्वच्छ आहे. काळ्याभोर पाषाणावर भगवान विष्णूचे पदचिन्ह, काल्याची वाटी, मोरपीस, चार बाजूला गाईची खुरं आणि लहान कान्हाजींची पावलं आहेत. शांत जागा आहे. आपण याला हात लावू शकतो.  भगवान विष्णूनी गयासुराच्या छातीवर  लाथ मारून त्याचा अहंकार घालवला ते हे विष्णू पद. श्री गुरु दत्तांनी गयासुराला वर दिला कि छातीवरच पदचिन्ह पंढरपुरी पुढील पिढीला दर्शनास राहील म्हणून हे इथे आहे. तसेच पादगया आणि गया तीर्थक्षेत्र म्हणून  प्रसिद्ध होईल.

गोपाळपुरा 
दिंडीरासूर राक्षसानी भूकंप घडवून गोपाळपूरातील झोपड्या उधवस्त केल्या. प्रत्यक्ष माउली तिकडे होती गावकऱ्यांनी ती घरं उभारताना प्रत्येक विटेवर विठूमाउलीच पाऊल ठेवलं ती पवित्र केली मग घरं बांधली. अनंतकाळ हि अशीच राहतील असा आशिर्वाद माउलींनी त्यांना तेव्हा दिला होता. माऊलीचा प्रत्यक्ष सहवास लाभलेली हि भूमी मन प्रसन्न करते. विठ्ठलचीच मूर्ती पण श्री कृष्ण रूपात या देवळात आहे. हि पहिली कि वाटतं विष्णू कृष्ण विठोबा एकच...  या देवळाबाहेर जवळच जनाबाई चे जाते आहे, तिचं स्वयंपाकघर आहे. भुयारी मार्गातून गेलं कि विठू माउली तिला भेटली ती जागा आहे. बऱ्याच बायका मुली या प्रांगणात फुगडी खेळून जात होत्या का? ते ठाऊक नाही. गोपाळपूर ठिकाण थोडं उंचावर आहे. पायऱ्या आहेत तसेच गाडी जायला आता रस्ता पण केला आहे. गोपाळपुऱ्यातील सावळे कान्हजी पाहून तृप्त मनांनी आम्ही पुंडलिकाकडं निघालो. 
पुंडलिक देऊळ व लोहदंड तीर्थ 
गाडीने जिकडे आम्ही उतरलो त्या डावीकडे विठ्ठल रखुमाई देऊळ तर उजवीकडे चंद्रभागा वाळवंट घाट होता. आधी चंद्रभागेचे र्दशन घेऊन मग विठ्ठल भेट करायची असते म्हणून नदीकडे वळलो. पन्नास तरी पायरी उतरून नदी किनार आहे. शुभ्र पांढरी वाळू. पाणी थोडं कमी होतं त्यामुळं चालत पुंडलिक देवळात जात आलं. काय भाग्यवान तो पुंडलिक! त्याला नमन केलं. त्याच्यामुळं भगवंत या भूमीवर थांबले. या देवळाजवळ आम्ही चंद्रभागेच्या काठी तिची ओटी भरून नदीत "नमामि गंगे हर हर गंगे" म्हणत दिवे सोडले. तिन्हीसांजेला ते खूप मनमोहक दिसत होते. मागेच लोहदंड तीर्थ होते. तिकडे दगडी नाव पाण्यात तरंगते तिथवर जाण्यासाठी मध्ये पाणी होते त्यात अंधार पडू लागला होता. ती नाव पाहता आली नाही. चंद्रभागेची वाळू कापाळी लावून आम्ही द्वारकाधीश देवळाकडे निघालो. या पांढर्या वाळुला महत्त्व आहे.
द्वारकाधीश देऊळ 
महाद्वार घाटावरचे शिंदे सरकार यांचे हे पुरातन देऊळ खूप खूप शांत मन तल्लीन होऊन जाते असे आहे. बाहेरून हे एका किल्ल्यासारखं दिसत. अगदी मुख्य दारातून द्वारकाधीश सहज दिसतात. डाव्या उजव्या बाजूला श्री राधा सत्यभामा अश्या मुर्त्या आहेत. देवळाच्या आजूबाजूला मोठा परिसर आहे जुना वाडा पडवी आहे. पण काही भाग पडला असावा अस वाटलं. या देवळाच्या बाहेरच्या मंडपात आमच्यातील एकानी सुन्दर भजनं म्हटली. वातावरण भक्तिमय झालं. कान्हाजींसमोर विठुमाऊलींच भजन दुधात साखरच! पंढरपुरी सुद्धा द्वारकेची आठवण यावी साठीच जणू हे देऊळ असावं. खूप शिस्तीची व्यवस्था दिसत होती. 
होळकर राम मंदिर 
द्वारकाधीश देवळाच्या अगदी समोर अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले राम  मंदिर आहे. हा कडेचा दरवाजा आहे. मुख्य द्वार चंद्रभागा घाटावर आहे. भव्य वाडा जवळ जवळ २ एकर जागेत आहे.  स्वतः अहिल्याबाईंचे वास्तव्य या जागेला लाभलेलं आहे. त्याजागी शंकराचे देऊन निर्माण होत असताना दास मारुती सापडला त्यामुळे अहिल्याबाईंनी राम मंदिर बांधण्याचा विचार केला. या वाड्यात सहा हातांची श्रीदत्त मूर्ती पण आहे. मोठ्ठा अंगण परिसर आहे. आमच्यापैकी काहीजण हा वाडा पाहून आले. खर तर एका संध्याकाळमधे पंढरपूरचे सगळे पाहून होणे शक्य नाही हे समजले. 
इस्कॉन टेम्पल 
पुंडलिकाच्या देवळासमोरील नदीकिनारी हे देऊळ आहे. मोठं पार्किंग आहे. आत गेलं कि भव्य गाभारा आहे, एकदम मोकळा. श्री राधा कृष्णाचं मनभावन रूप आपलं लक्ष वेधतेच . प्रभुपद घाट खूप मस्त आहे, नक्की बघावा असा. आमच्यापैकी काहीजण हे पाहून आले. 
इतकी मनमोहक ठिकाण पाहून मन आता विठ्ठल दर्शनासाठी आसुसले होते. शेगाव संस्थांमध्ये मस्त जेवण करून लगेचच आवरायला घेतलं. साधारण सव्वानऊला आम्ही सगळे नामदेव पायरीजवळ पोचायचे म्हणून निघालो. हे अंतर मोजून १० मिनिट आहे. आमची पूजा दर्शन बारी संपल्यावर होती. बरोब्बर दहाला आम्ही सगळे मस्त ॴवरून फुले हार विठ्ठल रखुमाईला अर्पण करायच्या वस्तू घेऊन तयार होतो. मोबाईल लॉकरमध्ये ठेवून आम्ही सव्वा दहाला गुरुजींबरोबर मुख्य विठठल रखुमाई देवळात शिरलो. 

श्रीधाम विठ्ठल रखुमाई देऊळ 
दर्शन बारी दरवाज्यातून आत जाताना आतून नामदेव पायरी दर्शन घेतलं. मोठ्ठा दिंडी दरवाजा ओलांडून आत पोचलो लहानसा मंडप ओलांडून आत पोचताच भव्य अति भव्य लाकडी मंडप लागला. गुरुजींनी इकडे बसा असा सांगितलं. उजवीकडे ३३ कोटी देव चकचकीत पितळेचे पाहायला मिळाले. सुंदर कोरीव कामाचे लाकडी खांब होते. वारकरी पंढरपूर जवळ आल्यावर दर्शनाच्या ओढीनं धावत का सुटत असतील?  भेटीची काय आतुरता होत असेल? हे मात्र आज जाणवलं. ही या जागेची कमाल आहे. सर्व संतांचे फोटो इतरत्र लावलेले होते. दर्शन बारीचे काही लोक पण बसलेले होते. नंतर सफाई कर्मचारी आले जणु सगळं देऊळच ते धुवून काढणार होते असं सामान हातात होतं. मुख्य द्वारासमोरून आतले काहीच दिसत नव्हते. इतक्यात गुरुजींनी तयार राहा सांगितले. दर्शन बारीची माणसे संपली. आता पूजा असलेले आम्ही फक्त उरलो होतो. पाच पाच जणांचा गट एकावेळी आत पुजला सोडणार होते. आपापला गट करून ओळीत उभे राहिलो. भक्त शिवाप्पा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 'गरुड खांब' आहे. भक्त शिवाप्पाना या खांबास बांधले होते. गोष्ट खूप छान आहे. पुढे उजवीकडे वळून साक्षात ती विठूमाऊली समोर येते. आता विठू माउली आणि आमच्यात दोन गाभारे अंतर उरलेले होते. पूजेची तयारी सुरु होती. सफाई सुरु होती. तोवर डोळे भरून प्रभूंची छबी डोळ्यात, हृदयात साठवत होते. पहिला गाभारा संपून आत जाताना संत तुकारामांची पावलं आहेत. शेजारी सामवेद मोठा ग्रंथ  काचेच्या पेटीत आहे. आता पाच जण फक्त आत सोडत होते. एकंदर ८-१० च  पाद्य पूजा होतात असा समजलं. 
आणि तो क्षण आला... जेव्हा ती विठाई माउली प्रत्यक्ष विठ्ठल समोर होता. हृदय गतीनं धडकू लागलं होतं. देवासाठी आणलेलं पिवळं पितांबर हिरवा शेला तिळगुळ घेऊन मुख्य दालनात पोचलेलो. गुरुजींनी नीट सरळ ओळीत उभं केलं म्हणजे नवरा बायको शेजारी, डाव उजवं बघून अस. बघा भगवंतास नमस्कार करा हे त्यांना सांगावं लागत होत. आम्ही नुसतं बघतच समोर उभं होतो. मी चटकन पावलांना हात लावला तसे म्हणाले आम्ही सांगू तेव्हा लावा. सोपस्कारे दुध, तुप, पिठी साखर, मध, दही असा वेगवेगळा अभिषेक करू दिला. पावलांना लावत चोळत मुखी नामाचा गाजर होता. हे करताना मी ते सावळे रूप वर पाहत होते. मन भरून घेत होते. नंतर धूप दीप ओवाळून हार पावलाशी ठेवले. पायाशी ठेवलेला तुलसी हार बायकोनी नवऱ्याला घालावा असा सांगितलं तर साधा हार नवर्यानी बायकोस घालावा. असा का असेल हे ठाऊक नाही. ओटीत नारळ दिला. वैयक्तिकपणे पायावर डोके ठेवायला सांगितले. नीट वेळ दिला गडबड केली नाही. मी मनात म्हणत होते "हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा..." गदगदलेलं मन डोळ्यातून पाझरू लागलं.  श्री बद्रीनाथ धामला शेजारती बुक केली होती परंतु दरड कोसळल्याने आम्ही वेळेवर पोचू शकलो नव्हतो, नुसते दर्शन झाले होते.  ती कसर भगवान विष्णूंनी पंढरपुरात शेजारतीच्या आधीच्या पाद्यपूजचे भाग्य प्रदान करून  पुरी केली. एक खंत  मिटली. यापुढे फळांचे ताट पेढे नैवद्य दाखवला. तोच प्रसाद म्हणून आम्हाला दिला. अभिषेकाचे तीर्थ घेऊन तिथंच उभं राहून परतीच्या भावनेची चुटपुट लागली. तसेच हार घातलेले मागच्या भागानी श्री रखुमाई च्या मुख्य गाभाऱ्यात नेण्यात आलं. अहाहा! काय रूप वर्णू तिचे. फोटोत पाहतो त्यापक्षा बोलके भाव विठ्ठल रखुमाईचे प्रत्यक्षात जाणवले. फोटोत दिसतो त्यापेक्षा भगवंत मूर्ती मोठी आहे. तशीच सगळी पूजा श्री रखुमाईच्या पायी पण करून घेतली. तीच तीच गोष्ट सतत सांगूनही तिकडचे गुरुजी अजिबात चिडचिड करत नव्हते. सर्व काही प्रेमानं करून घेत होते. त्यांचे मनापासून धन्यवाद. विठ्ठलाच्या पायी डोके ठेवता आले परंतु रखुमाईच्या पायापर्यंत पोचू शकले नाही. मध्ये चपटी दानपेटी होती तिच्यामुळे कोणीच बायका मंडळी बहुतेक रखुमाईच्या पायी डोके ठेऊ शकल्या नसाव्यात.  पायाच्या बोटांवरच डोके टेकू शकले हेच खूप भाग्य लाभले असच समजते. रखुमाईच्या शेजारीच सत्यभामा आणि श्री राधाचे पण देऊळ आहे. रखुमाईला साडी चोळी उपरणे ओटी वसा तिळगुळ प्रसाद दिला तसेच सत्यभामा श्री राधा ला पण दिले. शांत काळीभोर जागा पाण्यानं नुकतीच धुतल्याने आणखीनच काळीभोर दिसत होती. जवळजवळ एक फुलपात्रभर तीर्थ प्रत्येकी देत होते. शेजारती पाहायची आहे विचारू म्हटलं पण खरा सांगू जे लाभले तेच इतके भरभरून होते कि आणखी कोणतीच इच्छा नव्हती. सांगतील त्या मार्गानी बाहेर आलो. १६ जणांच्या मनाची मोरपिसच जणू बाहेर आली होती.  त्या परामश्वराचे अनंत आभार आज सेवेचा योग्य आणला. या योगात ज्यांची ज्यांची मदत झाली त्या सर्वाना मनापासून धन्यवाद. बाहेर आल्यावर माझ्या आग्रहाखातर ग्रुप फोटो झाले. आयुष्यातली आठवण. आपण आयुष्य कसे जगलो ते नंतर पहाताना हे फोटोच मदत करतात, पाटेकरांनी म्हटलच आहे. अगदी बरोब्बर आहे ते. मोबाईल लाॅकर मधून घेऊन भट्टीवरचे मसाला दूध चहा घेऊन १६ मोर पिसं शेगाव संथान मधील खोलीकडे  वळली ती एक उच्च अनुभूती घेऊनच !
रात्री साडेबाराच्या सुमारास खोलीत पोचलो. तासभर तरी वळवळच झाली कधी झोपले पांडुरंगासच ठाऊक. पहाटे लवकर उठून साडेसातला पंढरपूर सोडायचं होतं कारण दहा वाजताचा अक्कलकोटचा अभिषेक पाहायचा योग होता. 
पहाटे साडेपाचला ऊठुन आवरून गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतला. तळघरातलं ध्यान मंदिर बघुन रामाच्या देवळात दर्शन आरती घेऊन संस्थानच्या प्रसादालयात नाश्ता करून आम्ही निघालो.
अक्कलकोट
साडेदहाला अक्कलकोटला पोचलो. गुरूजी वाटच बघत होते. अभिषेक झालेला होता. पण गुरूजीनी गर्दीतून आत नेलं ते एकदम अक्कलकोट स्वामी समर्थ! असं पावरफुल माध्यम लाभलं आम्ही नशीबवान आहोत. प्रत्यक्ष स्वामी समोर होते, ईतका बोलका चेहरा काय सांगावे! काय ते तेज! असं वाटावं की ते पटकन उभेच राहणार आहेत की काय.... लोखंडी दारातुन आत जाता आलं. जय गुरुदेव दत्त.
गाणगापूर
अक्कलकोट दर्शना नंतर आम्ही गाणगापूरला निघालो. साधारण तीनला गाणगापूरच्या काही किलोमीटर आधी जेवायला थांबलो. सकाळच्या ऊपीटवर तरलो होतो. सगळेजण पोटभर जेवलो. गाणगापूरला पोचायला चार वाजले तासभर आराम करून आधी निर्गुण पादुका दर्शन घेऊ असं ठरलं. गुरूजींना फोन झाला त्यांनी बाकीचं दर्शन घेऊन पावणेसात ला पालखी च्या आधी भेटुन असं सांगितलं.

स्वतः श्रीगुरू दत्त ज्या वैश्णवी राजकुमारीच्या संगमभूमी क्षेत्री (आजचे गाणगापूर) वास्तव्यास होते त्या जागी आज आपण आहोत अहो भाग्य! हाॅटेलपासुन निर्गुण पादुका ठिकाणी तीन मिनिटांत पोचलो पुढं चालत पाच मिनिटांत देवळासमोर होतो. गर्दी कमी होती. जेवढं ऐकलं वाचलं होतं ते मी आठवत होते. मन आनंदी होतं. 

ओळीतुन दर्शन घेऊन सभामंडपात बसलो. झरोक्यातून दर्शन केलं तेव्हा पादुका दिसल्या नाहीत खुप फुल होती असं मला वाटलं पण नंतर समजलं की पालखीच्या आधी निर्गुण पादुका तिकडे नसतातच त्या आतल्या बाजुच्या देवघरात उत्सवमूर्ती च्या मागे असतात. पावणेसातला गुरूजी आले आमचा अभिषेक ठरला, नंतर त्यांनी त्या देवघराकडे नमस्कारासाठी नेलं. तिकडे  श्री नृसिंह सरस्वती महाराजांची उत्सवमूर्ती जवळुन बघता आली, नमस्कार करता आलाच पण अलभ्य लाभ असा की मगाचची चुटपुट मिटली कारण अनपेक्षितपणे पावन "निर्गुण पादुका" !  दर्शन घडलं.  दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे त्यासमोर होत्या. जेवढे फोटो बघितले, रांगोळ्या बघितल्या त्यांच्या कैकपट जीवंत स्पंदाच्या अशा त्या अनुभवल्या. लाल चुटुक मखमलीच्या एका भरीव गोला सारख्या त्या जाणवत होत्या. पादुकांची संपुटे ऊंच होती पिवळी धमक्क होती. मोठ्ठ्या देवघरात त्या होत्या, समोर एक गुरूजी उत्सवमूर्ती बरोबर होते. शांत दर्शन घेऊन पालखी सोहळा पाहायला खाली आलो. 
ठराविक ठिकाणी उभं रहा जिंकुन दर्शन नीट होईल अशी जागा  दाखवून गुरूजी गेले. पालखी थोडी थांबते चारही दिशांना. तरी ज्याला जिथं आवडेल तिथं जो तो उभा राहिला. सभामंडपात लोखंडी बार आहेत, त्रासलेले भुतबाधा झालेले त्यावर लटकतात. बाधा मुक्तीची ही जागा - श्रीदत्तांची कृपा! पूर्ण परिसर दत्तमय... पालखी सजवणे, महाराजांचं स्थान सजावट, पालखी वाटेवर रांगोळी घालणे अशी लगबग दिसून येताच आपलीही ऊत्सुकता वाढते. नगारा झांजेसारखं वाजत असतं, (पण त्या आवाजात पदं कान देऊन ऐकावी लागतात कारण पलिकडे पालखी गेली की तोच आवाज जास्त येतो.) गावठी गुलाबाची फुल विकणारा, बिसलरीवाला प्रदक्षिणा मार्गावर  फिरू लागतो हे जरा अजबच वाटलं. तसंच खिसेकापु पण सापडले. पालखी बाहेर पडणार ती समोरून दिसेल असं मी ऊभी होते. काय कसब, धैर्य आणि नशीब  लागतं पालखी ला हात द्यायला हे समजलं. सुंदर पदं म्हणत तीन प्रदक्षिणा झाल्या. आतापर्यंत नसलेला पण अचानक जाणवणारा गर्दीचा लोंढा आम्हाला आपोआपच बाहेर घेऊन आला. कित्ती दिवस बघायचं घोकलेला पालखी सोहळा आज बघितला, श्रीदत्तांचीच कृपा!
दुसर्या दिवशी सकाळी साडेसहाला अभिषेकाला या असं ठरलेलं त्यामुळे लवकर जेऊन झोपुन असं फक्त ठरलं. झोपायला वाजायचे तितकेच वाजले. सहाला मंडळी निघालो. संगमावर नंतर जायचं होतं. चार घरचे चार वैयक्तिक अभिषेक खुप छान झाले. परत पावन निर्गुण पादुका दर्शन करू शकलो. नवीन वर्षात श्रीदत्तकृपेनेच हे शक्य झालं. नंतर दत्ताशमाला मंत्र, एकादशी होती म्हणुन श्री विष्णू सहस्त्रनाम म्हणुन संगमाकडे वळलो.
भीमा अमरजा संगम क्षेत्री आलो. संगमावर जातानाच सोडायचे दिवे टोपली तयार करून घेतले. र्सव सामान अहोंच्या  स्वाधीन करून संगमात उतरलो. पायाखाली पसरणारी वाळू, कातडीला होणारा पाण्याचा स्पर्श, हवेमुळे हळुवारपणे पायावर आपटणारं ते जल साक्ष होत त्या तत्वाची आमची भेट घडल्याचं. अलभ्य लाभ.. श्रीसूक्ताच्या स्वरांच्या तालावर दिवे पाण्यात डोलत होते. कोण कुठले चार ठिकाणचे जीव आम्ही एकत्र हे आज अनुभवत होतो. भगवंताची लीला अगाध आहे. संगमावर ओटी भरून आम्ही औदुंबर दर्शनाला गेलो. 

श्रीगुरुचरित्रातील चाळीसाव्या अध्यायात वर्णन केलेल्या औदुंबराचीही प्रदक्षिणा झाली. या वृक्षामध्ये साक्षात दत्त प्रभूंचा वास आहे. हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधी मुक्त झालेले आहेत. 
नंतर श्री गुरुदेव दत्तांच्या संगम क्षेत्रीच्या देवळात गेलो. काळ्याभोर रंगाच्या ह्रदयात गारवा देणार्या पादुका तसेच एकादशी निमित्त निळ्या रंगातले भगवंत दर्शन लाभलं. तो परिसर सोडून जाणं कल्पनाच करवत नव्हती. जवळच असणारा भस्म डोंगर बघुन आलो. वाचनात आलेले सगळं रीकाॅल होतं होतं. गाय वासराला चारा देण्याची आईची ईच्छा पुर्ण झाली. तशी गर्दी आजही कमी होती. 

श्री कल्लेश्वर महादेव तसेच शनेश्वर
महादेवाच सुंदर देऊळ आणि शनीच मुख्य देऊळ ईकडे आहे. या महादेवाच अभिषेक केला की श्रीशैल्यचे पुण्य लाभते. अनायसे शनिवार होता आमच्या पैकी काहीनी शनीची पुजा केली.
गाणगापूरचे संगम स्थल भक्ती स्थान,  निर्गुण पादुका मठ कर्म स्थान, श्री कल्लेश्वर मुक्ती स्थान करून यात्रा पूर्ण होते.

अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त!
शुभं भवतु!
सौ.गौरी पाठक
९९७०१६८०१४